श्यामची (आणि आमची) आई
आईची शिकवण: एक आठवण
आम्ही त्याकाळीं चिपळूणला नव्याने रहायला आलो होतो. मी 11 वर्षांचा होतो. कोंकणांतला पहीला पावसाळा. विहिरी तुडुंब भरलेल्या असायच्या आणि माझ्या वयाची शेजार-पाजारची मुलं आमच्या घराच्या पाठीमागल्या विहिरीत पोहायला उतरत. मला अजून पोहायला येत नव्हतं म्हणून मी घाबरत असे. माझ्या आईने मला अगदी जबरदस्तीने इतर मुलांबरोबर पोहायला पाठवलं. सुरुवातीला मी गटांगळ्या खाल्ल्या. नाकातोंडांत पाणी शिरलं, पण पोहायला शिकलो. रामतीर्थावर इतर मुलांबरोबर पोहायला जायला मजा वाटूं लागली. मी त्यावेळी 'श्यामची आई' ही कादंबरी नुकतीच वाचली होती. मला माझ्या आईची शिकवण पटली. मला वाटतं, त्याकाळी घरांतल्या सर्वांनी 'श्यामची आई' वाचली असावी. एके दिवशी आम्ही सर्व जेवायला बसलो होतो. जेवणांत सगळं अळणी लागत होतं. आण्णांना ( आमच्या वडलांना) नेहेमी मीठ थोडं जास्त लागत असे. पण आण्णांनी आम्हां सर्वांना गप रहायची खूण केली. आई जेवायला बसली तेंव्हा तिच्या लक्षांत आलं. 'कां रे? सैपांकात मीठ नाही हे कोणीच कां बोललं नाहीं, सर्वांनी श्यामची आई वाचली कां?'
लोड होत आहे...
प्रतिसाद